छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी भरत भर सार्वजनिक सुटी असते.
भारता बाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. ३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.
0 Comments